Friday, June 14, 2013

बायकांचे स्नानगृह

इतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय काढलंय पाहात होते. एका चित्रापाशी थबकले. तिने "बायकांचे स्नानगृह" काढलेले. .........
 हे चित्र दोन महिने आमच्या भिंतीवर लटकत होते..... मी विसरून गेलेले. हसायला आलं.
तिसरीतल्या मुलीने जितक्या सहजपणे काढावे तितक्या सहजपणे मुक्ताने ते काढलेले.
दोन तीन बायका आंघोळ करताहेत, केस बांधलेले, कपडे बाजूला, पाणी... वगैरे वगैरे......
त्यावर्षी आम्ही मनालीला गेलो होतो.
मग मणीकरणला गेलो होतो.
तिथे गरम पाण्याची कुंडे आहेत.
पुरूषांची आणि बायकांची स्नानाची व्यवस्था वेगवेगळी आहे.
बायकांच्या इथे कुंडाभोवती भिंती बांधलेल्या आहेत, वर छत आहे.
ती आणि मी, बायकांच्या गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे गेलो तर, क्वचित एक चार- दोन बायका होत्या. बहुदा गावातल्या किंवा आसपासच्या पहाडी भागातल्या. त्या तिथे निसंकोच स्नान करत होत्या, तिकडे कुणी पुरूष फिरकायची अजिबात शक्यता नव्हती. मला त्यांचे कौतुक वाटले, मुक्ता त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहात असलेली. आणि कदाचित माझ्याकडेही... मी तिथेही कपडे घालून पाण्यात उतरलेली....
 तिच्यासाठी बाईचं शरीर पाहण्याचा तो पहिलाच प्रसंग असेल. तिच्या कितीतरी प्रश्नांना उत्तरे मिळत असणार. मलाही वाटून गेलेलं , बरं झालं कुतूहल शमलं असेल, विचारले काही प्रश्न तर बघू.
 तिने काही विचारलं नाही.
आणि नंतर हे चित्र!...............
सहजपणे काढलेलं........
मग मीही सहजपणे ते भिंतीवर लावलेलं........

आज मला जाणवतंय.....
कपड्यांची किती बंधनं निदान आपल्या संस्कृतीत, बायकांवर आहेत!
कपड्यांविनाचा मोकळेपणा त्या अनुभवूच शकत नाहीत!

1 comment:

  1. विद्या हा ब्लॉग वाचताना एक प्रसंग आठवला.आम्ही दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला गेलो होतो. एका बीचवर दहा बारा जणांचा परदेशी बायका पुरुषांचा एकत्र ग्रुप गप्पा मारत बसला होता.त्यातली एक बाई बिकनीमध्ये तिच्या लहानमुलाला दूध पाजत होती.त्या ग्रुपमध्ये बसून आणि बीचवर आजूबाजूला इतर माणसांची वर्दळ असून.....पण तिला त्याची काहीही पडली नव्हती.त्याच ग्रुपमधल्यांची पाच सहा वर्षांची मुलं मुली एकत्र नागडी वाळूत खेळत होती. हा त्यांच्यातल्या संस्कृतीचा भाग आहे असे मला वाटते.आपल्याकडे आजूनही ब-याच बाबतीत बंधने आहेत.मुलाला दूध पाजायचं असेल तर खांद्यावरुन पदर घ्या आणि वेगळ्या खोलीत जाऊन बसा.उन्हाळ्यात उकाड्याने जीव हैराण झाला तरी अंगभर कपडे घाला.सगळ्यांच्या समोर कपडे आवरुन सावरुन बसा. साडी नेसली तर माझा पदर हलणार नाही यासाठीची काळजी घ्या,आतले कपडे वाळत घालायचेत त्यासाठी कोणाला दिसनार नाहीत अश्यासाठी आडोसा शोधा. अशी एक ना अनेक बंधने.....

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...