Thursday, February 28, 2013

बलात्कार x x


आपण शील ही जगण्यापेक्षा किमती वस्तू करून करून ठेवली आहे.
जोहार काय? सती काय? काय आहे यांच्या मुळाशी?
बाईनं पवित्र राहिलं पाहिजे. बाई ही घराची, कुटूंबाची एक गौरवाची वस्तू असते,
ती घासून पूसून चकचकीत ठेवायची. मिरवायची. तिच्यावर डाग पडून चालणार नाही.
डाग पडला आणि पुन्हा धुवून टाकला... चालणारच नाही.
ते काचेचं भांडं आहे, तडा गेला की संपलंच!

जन्मभर बाईने प्रामुख्याने काय करायचं आहे? तर स्वत:ला सांभाळायचं आहे.
लहानपणापासून मुलींना काय काय शिकवलं जातं?

माझ्या आईने मी कळती झाल्यावर दोन गोष्टी सांगितलेल्या....
एकदा सांगितल्या, त्यातला गंभीरपणा मला कळला, पुन्हा तिने सगळं माझ्यावर सोडून दिलं.
पहिलं हे होतं की कुठल्याही पुरूषाशी बोलताना थेट डोळ्यात डोळे घालून बोलायचं नाही.
खालमानेने पुरूषांशी बोलायचं? का म्हणून? ते काय आकाशातून पडलेत का?
ह्या! मला नाहीच जमणार आणि नाहीच चालणार!
डोळे हे संवाद साधण्याचं महत्त्वाचं आणि प्रभावी साधन आहे.
आपण जर नीट समोरच्याच्या डोळ्यात बघून बोललो तर आपला आत्मविश्वास पोचतो त्याच्यापर्य़ंत,
आणि बाईला कळतंच ना, समोरचा पुरूष कुठल्या नजरेने पाहतो आहे ते,
अशा पुरूषांना नजरेने तिथल्या तिथे गप्प बसवता येऊ शकतं, नाहीतर सोडून द्यायचं/ द्यायला लागतं.
कोणी पुरूष नकोशा नजरेने माझ्याकडे पाहतो आहे, डॊळ्यांनी सांगून त्याला कळत नाही आहे,
तर त्याला गप्प बसवण्यासाठीचे शब्द मी शोधले पाहिजेत.
माझा प्रॉब्लेम हा आहे की मी शिव्या देऊ शकत नाही. पण कुठले तरी सभ्य अशब्द मला वापरता आले पाहिजेत.
त्या शब्दांमुळे त्यालाही आणि आजूबाजूच्या इतरांनाही माझी नाराजी/ त्रागा कळला पाहिजे.
असे शब्द माझ्या पिढीत माझ्याकडे नव्हते.

तर मला म्हणायचंय असं की पुरूषांच्या नकोशा पाहण्यासाठी मी काहीतरी उत्तर शोधीन पण म्हणून सरसकट सगळ्या पुरूषांच्या डोळ्यात "थेट आणि नीट" न पाहता बोलायचं, हे स्वीकारणार नाही.
 मी ते पाळलं नाही.

दुसरं तिने सांगितलेलं की कुठल्याही वयाचा कुठलाही पुरूष आणि आपण असे दोघेच एका घरात असू, खोलीत असू, तर असं थांबायचं नाही. तिथून बाहेर पडायचं.
 हे मी पाळलं खूप वर्षं! आता सोडून दिलं.
हे जे सांगणं आहे ना? त्यात अख्य़ा पुरूषजातीबद्दलची बायकांना वाटणारी भीती दडलेली आहे.

यामुळे होतं काय की आम्ही पुरूषांना समजूनच घेऊ शकत नाही.
त्यांच्याशी मैत्रीच होऊ शकत नाही आमची.
अख्खं पुरूषांचं जग अनोळखीच राहून जातं.
अनोळख असल्याने आपसूकच भीती वाटायला लागते.
बाईच्या आयुष्यात येणारा पुरूष म्हणजे नवरा.
त्याच्याशी जर मैत्री करता आली तर जरा खिडक्या उघडू शकतात
अन्यथा अंधारच!

एकाच जगात, पुरूषांचं वेगळं आणि बायकांचं वेगळं अशी दोन जगं आहेत,
एकमेकांना समातंर अशी!

नव्या पिढीत, आपल्या मुलांमधे, मुलामुलींची मैत्री दिसते आहे.
ही दोन जगं मिसळण्याच्या काही शक्यता मला दिसताहेत.

या मैत्रीमुळे पुरूषांच्या जगाचं स्त्रियांच्या जगावरील आक्रमण कमी होईल,
थांबू शकेल.

Saturday, February 16, 2013

बलात्कार x


मी नववीत असेन. आमचं घर जरा गावाबाहेर होतं. आत्यांचं गावात. काहीतरी कारणाने आईला आत्यांकडे रात्री राहावं लागलं. सकाळी लवकर उठून यायला लागणार होतं. आमचे डबे, सकाळची कामं, असं काय काय होतं. तेव्हा सकाळी सहाला आईला यायला बस नव्हती. आई तीन- साडेतीन किलोमीटर अंतर चालत आली. मी विचारलं, " रिक्षाने का आली नाहीस? बस नसली तरी रिक्षा असतात ना!"
 ती रिक्षाने आली नव्हती कारण इतक्या पहाटे तिला रिक्षाने यायला सुरक्षित वाटलं नव्हतं. त्यानंतर आम्ही दुपारी निवान्त बोललो तेव्हा ती जे म्हणाली ते माझ्या अजून लक्षात आहे. " माणसांची/पुरूषांची भीती वाटते. त्यांचा काय भरोसा? किडा-मुंगी-सापाची नाही एवढी भीती, फारतर काय?, जनावर चावेल आणि मृत्यू! त्याला काय घाबरायचं? "

 मृत्यू चालेल पण पावित्र्यभंग नको, बलात्कार नको.
अशा भावना का रूजलेल्या असतील? जीवन त्यापेक्षा महत्वाचं नाही का?
पावित्र्य न राखता जगायची वेळ आली तर ते जिवंतपणी मरण असं का?
कुणाचे अपघात होतात, हात पाय तोडावे लागतात आणि ते जगत असतात, नव्या परीस्थितीशी जुळवून घेत.
आपली मानसीक घडण अशी झालेली असते की बलात्काराकडे नाही अपघाताइतकं सहज पाहता येत.
तरीही दुर्दैवाने कुणावर तशी वेळ आली तर ती मागे सारून पुढे जाता यायला हवं.
आपण ठरवून टाकूया, कुणावर बलात्कार झाला तर आपण तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणार नाही .
वागण्यात बदल करणार नाही, तिची पूर्वीची प्रतिष्ठा अबाधित राहील, हे पाहू.

******
बाईच्या पावित्र्यावर, योनिशुचितेवर का समाजाची इतकी नजर असावी?
तिचं स्थान का त्यावर अवलंबून असावं?
बलात्कारांची आकडेवारी अशी आहे की भीती वाटावी.
कोणीही बाई खात्रीने माझ्यावर बलात्कार होणारच नाही, असं नाही सांगू शकणार.
समाजाने ठरवायला हवं तसं बाईनेही ठरवायला हवं.
"माझ्यावर बलात्कार झाला तर मी त्यातून बाहेर येईन.
स्वत:कडॆ अपराधी नजरेने पाहणार नाही.
पूर्वीच्याच प्रतिष्ठेने जगेन. त्यासाठी किमान आजूबाजूचा समाज बदलवेन.
त्यांना मला स्विकारायला लावीन."

तुम्ही वाचक पण यात सामिल व्हा.
आणि ठरवून टाका, की " आजूबाजूच्या, परिचयाच्या, कुठल्याही स्त्रीवर बलात्कार झाला असं समजलं तरीही आम्ही तिच्याशी अपराध्याशी वागावं तसं वागणार नाही, किंवा अतिरीक्त काळजी घेऊन गुदमरून टाकणार नाही."

तिला नाव लपवण्याची वेळ येऊ नये इतकं समाजाने समजूतदार व्हायला हवं.

******

Friday, February 1, 2013

बलात्कार


पंचवीसेक वर्षांपूर्वीचं असेल. तालुक्याच्या गावातील एक डॉक्टर जोडपे. स्कूटरवरून जवळच्या खेड्यात जात होते. स्कूटर बंद पडली. खटपट करूनही सुरू होत नव्हती. थोड्या वेळाने एक ट्रक येत होता, तो थांबवला आणि सोडण्याची विनंती केली. दोघे ट्रकमधे बसले. पुढे गेल्यावर निर्जन ठिकाणी ट्रक थांबवून ट्रकमधल्या दोघातिघांनी त्या बाईवर बलात्कार केला. नवर्‍याला एकाने धरून ठेवलं.....
 दोघेही किती अपमानित झाले असतील. एकमेकांकडे पाहावंसही वाटलं नसेल. नंतरचे काही दिवस किती अवघड असतील..
 सगळ्यांना कळलं असेल असं नाही पण काहीजणांना निश्चितच कळलं. त्या डॉक्टर नवर्‍याने काय काय विचार केला, आणि बलात्कार झालेल्या आपल्या बायकोला घटस्फोट द्यायचं ठरवलं. ती साधी नव्हती. तिने घटस्फोट द्यायला नकार दिला. ती नव‍र्‍याला म्हणाली, " मी काय स्वत:च्या मर्जीने गेले का? तुम्ही समोर होता ना? आता घटस्फोट द्यायला निघाला आहात तेव्हा का नाही बायकोला वाचवलंत?"
 हटून राहीली .... नाही दिला घटस्फॊट तिने .... तिच्याकडे मुद्दे होते....
दोन माणसांतलं नातं काय असं मुद्द्यांवर असतं का? ते ही लग्नाचं नातं?
बलात्कार झाला, नवरा असहाय.. काही करू शकला नाही. हे तिने पचवलं असेलही पण नंतर घटस्फॊट देऊ इच्छिणार्‍या नवर्‍याला त्या बाईनं कसं समजून घ्यायचं?
 पवित्र अपवित्रतेच्या समाजातील कल्पनांचा खोलवर पगडा, स्वत:च्या असहायतेनंतर, अपमाना्नंतर, स्वत:ची तथाकथित प्रतिष्ठा सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न असंच काही असणार घटस्फोट घेण्याच्या इच्छेमागे.
 शिवाय पुरूषत्वाच्या / पौरूषाच्या चुकीच्या कल्पना.
******
या गोष्टीत ती ठामपणे उभी राहिली म्हणून नंतर संसार झालाही असेल नीट, चारचौघांसारखा...
पण अशा तूटून गेलेल्या नवर्‍याबरोबर संसार करत राहणे हीसुद्धा शिक्षाच नाही का?
तिने काय विचार केला असेल? सोडण्यापेक्षा राहणं सुसह्य होईल?
******
बलात्कारीत स्त्री समोर काय पर्याय असतात, पुढील आयुष्य जगण्याचे?
समाज काय ठेवतो पुढ्यात?
आयुष्याची सरळ रेष का विस्कळीत होऊन जावी?
आधीच ती मना शरीराने खोलवर दुखावलेली असताना, तिच्या जवळच्यांना तिच्या विरोधात उभे करणारे कसले हे समाजाचे नियम?
कसल्या या पावित्र्याच्या कल्पना?
आपण कधीतरी या तपासणार आहोत का?

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...