Saturday, April 3, 2010

जरा विचार करू या - २

आमच्या मावशी, आम्ही सर्वत्र मधे राहायला आलो तेव्हापासून आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मुलगीपण यायची. काम स्वच्छ, नीटनेटकं, जास्त बोलणं नाही की चौकशा नाहीत.


हळूहळू त्या रूळल्या, मग काही काही बोलायला/ सांगायला लागल्या. आधी धाकटी दोन मुलं गावाकडे शिकत होती. मावळात त्यांचं गाव. त्या मुलांना शिकायला इकडं आणलं. मोठा मुलगा आणि मुलगी आधीच इथे आले होते. नवरा मुंबईत गिरणीत होता. सगळे गिरणीकामगार बेकार झाल्यावर हे कुटूंब काही दिवस गावात राहून नंतर इथे आले. नवर्‍याला दारूचं व्यसन. तो काहीच काम करत नाही, इतक्या वर्षात दोन-तीन वर्षे काहीतरी काम केले असेल.

मोठ्या मुलाने दहावीनंतर शाळा सोडली, नोकरीला लागला, मावशींना जरा त्याचा आधार. तो वूडलॅन्ड मधे वॉचमन होता. काही गुंड कुणाशीतरी भांडण म्हणून सोसायटीत घुसले, हा त्यांच्यामागे धावला, प्रतिकार करत होता तर त्यांनी यालाच मारले. तो गेला. मावशी खचल्या, म्हणाल्या मी आता या गावात राहात नाही. मावळात परत गेल्या. महिन्या दीड महिन्याने परत आल्या. तिकडे बसून राहून खायला काय मिळणार? पुन्हा माझ्याकडे यायला लागल्या. कुठे कोर्टात केस करणार? संबंधीत मंडळी म्हणाली पैसे देतो, यांनी मान्य केलं. खूप मागे लागल्यावर ठरलेल्या एक लाखापैकी नव्वद हजार मिळाले. चाळीस हजारात लेकीचं लग्न केलं. चाळीस हजारात सुतारदर्‍यात जागा घेतली. उरलेले उडवले नवर्‍याने. निदान जागा घेतली गेली.

सगळ्यात धाकट्याला कांजिण्या झाल्या, ताप मेंदूत गेला तो हातपाय वाकडे करू लागला. मी हे रोज ऎकत होतेच, नीट चालत नाहीये म्हंटल्यावर मी त्याला मुक्ताच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले, पुढे न्युरोसर्जन आणि काय काय तपासण्या, पंधरा दिवस दवाखान्यात, मग बरा होऊन घरी आला, वाचला. त्याचे लाड वाढले, अभ्यासातलं लक्ष कमी झालं.

दुसरा अभ्यासात बरा आहे, त्याच्याही परीक्षांच्या वेळेस बापाचा पिऊन गॊंधळ, भांडणे.

मग शेती विकून घर बांधायचे ठरवले, आता पैसे येणारच म्हणून नवर्‍याची दारू, उधारी वाढली.

आम्ही इकडे राहायला आलो. मावशींना म्हंटले तुम्हीच या इकडे. त्यांना पायी बरंच दूर पडतं, पण येतात. मग इथेच आणखी दोन कामे पाहून दिली, त्यांनी मयूर कॉलनीत जाणे सोडले.

खूप प्रयत्नांनी शेती विकली गेली, आलेल्या दीड-दोन लाखात पत्रे घालून घर बांधलं. मोठ्याला दहावीला चांगले मार्क्स मिळाले, तो बारावी करून आता BCS करतोय, अर्धवेळ नोकरी करतोय, तरी महागाई इतकी वाढली आहे, घर चालवणं अवघड जातं.

त्या जरा स्थिरस्थावर झाल्या की काहीतरी संकट उभं राहतं, नवर्‍याची उधारी, नाहीतर दारू, नाहीतर आजारपण.परवा म्हणाल्या, ” घरात अगदी दाणा नव्हता, कुणाकडून तरी शंभर रूपये उसने आणले, त्यातनं किलोभर गहू, साखर आणि असाच काहीतरी किराणा आणला, सत्तर संपले, तीस उरले तर धाकट्याला बरं नाही दोन दिवसांपासून म्हणून दवाखान्यात पाठवला.” त्यांना रोज भाजी खाणं शक्य होत नाही. समतोल आहाराचं काय? धाकट्याला कावीळ आहे म्हणून डॉक्टरांनी सांगीतलं. तपासण्या करायला सांगीतल्या. ’दैव कसं कुठूनही मारायलाच बघतय’ म्हणत होत्या.

आज तपासणीचे रिपोर्ट आले. त्यांना सोडायला आणि रिपोर्ट बघायला गेले होते. ऎरवी कधी सोडायला गेले तर त्यांना शिवतीर्थनगरच्या रस्त्यावरच सोडते. आज घरी गेले. इतके आत आत घर आहे, मला सापडले नसते. रिपोर्ट पाहिला. हिमोग्लोबीन ६.४ आहे, WBC खूप कमी आहे. डॉक्टरांनी अ‍ॅडमीट व्हायला सांगीतलं आहे.

काय करायचं या बाईने आता?

मी तरी काय करते? करू शकते? हवे तेंव्हा हात उसने पैसे देते, त्यांना बरं वाटावं असं बोलते, त्यांचं ऎकून घेते, त्या नाही आल्यातरी चालवून घेते. यापलीकडे काय??



गेल्या दहावर्षात माझं आयुष्य कसं गेलं? संथ, निवान्त.

का? माझ्या जातीमुळे? माझ्या शिक्षणामुळे?

बाई बाईच्या आयुष्यात इतकी तफावत का असते?

त्यांनी माझ्याघरी काम करावं, असं मी काय कमावलंय? मी त्यांना कामाचे मोल देऊ शकते, तेही स्वत: कमावून नाही तर माझा नवरा कमावतो म्हणून!

जगण्याच्या प्राथमिक गरजांसाठी मला झुंजावं लागत नाही, म्हणून मला इतर गोष्टी सूचू शकतात.

मी जे माझे प्रश्न म्हणते ते मावशींच्या खिजगणतीत तरी असतील का?

ते माझे प्रश्न तरी खरे की आभासी?



*****************



आत्ता जरी मला याचा त्रास होत असला तरी हे लिहून झालं की मी उठेन. सचिनकडे कांदाभात न्यायचाय म्हणून कांदा बारीक चिरेन. मन लावून भात करेन. तिथे गेल्यावर मजेत गप्पा मारेन, एका कोपर्‍यात मावशींना आठवत असले तरी.

मावशी कुठ्ला दवाखाना स्वस्तात पडेल याचा विचार करत असतील.

त्या कुठे घरगुती/ अंधश्रध्देचे उपाय करत नाहीयेत याचं बरं वाटून घेईन.

No comments:

Post a Comment

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...