Thursday, January 28, 2010

सखीत्व

’नाद तुझा लागला, ग गौराई छंद तुझा लागला’
आमच्या मावशी आणि त्यांच्या मैत्रिणी फेर धरून एका तालात नाचत म्हणत होत्या. पायांची त्रिकोणी हालचाल ,एक टाळी खाली, एक टाळी वर,
आमचे डोळे फिरत होते.
गेली दहा वर्षे मावशी आमच्याकडे येताहेत, त्या इतक्या छान नाचतात आणि गातात , मला माहितच नव्हतं. लोककलाकारांचा असतो तसा त्यांचा खडा आणि मोकळा आवाज, थेट काळजाला हात घालणारा. आम्ही भारावून गेलो, मी आणि अश्विनी.
मावळात नागपंचमी ते गौरी उठे पर्यन्त रोज बायका देवळात जमून नागपंचमीचे खेळ खेळतात. आमच्या मावशी इथे सुतारदर्‍यात राहतात. तिथे त्या मैत्रिणी जमवून कुणाकुणाच्या घरी खेळतात. पाच सहा वर्षांपासून मी हे खेळ बघायला जायचं ठरवतीये. नव्हतं जमलं. कारण काहीच नाही, आपण कुठल्या कुठल्या फुटकळ गोष्टी करत राहतो आणि महत्त्वाच्या मागे पडत जातात तसंच.

यावर्षी माझ्यासाठी मावशींनी खास त्यांच्या घरी खेळ ठेवले होते. अश्विनीला विचारलं , येतेस का? तयार झाली. माझा मंगळागौरींचा काहीच संबंध आलेला नाही. अश्विनीला ते खेळ माहित होते, बरेचसे येत होते, आवडीचे होते. रात्री दहाला आम्ही मावशींकडे गेलो, बारापर्यंत थांबलो, त्या बायका पुढेही दीड-दोन पर्यंत खेळत होत्या. अश्विनी म्हणाली, आम्ही खेळतो ते अगदी प्राथमिक आहे, ह्या तर ग्रॅजुऎट आहेत.

त्यांच्या त्या खेळावरच खरं तर एक सविस्तर लेख लिहायला हवा. आम्ही बघत होतो, त्यांचा उत्साह ओसंडून वाहात होता. गुगल अर्थ वर जर चैतन्य प्रकाशमान होताना दिसू शकत असतं तर अख्ख्या पुण्यात आम्ही उभ्या होतो तो ठिपका तेजाने उजळलेला दिसला असता. तो अनुभव आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आदिवासींपासून आजपर्यंतच्या प्रवासात कुठल्या ट्प्प्यावर आपला तो नृत्याचा धागा तुटून गेला कोण जाणे, समुहनृत्याचा.

ते असो, आज मला वेगळं सांगायचं आहे. मी पाहात होते त्या बायकांमधला परस्पर संबंध. त्यांच्या गप्पा, त्यांच्या चेष्टा, गमती. कोणीच पुरूष नसल्याने त्या निवांत, मोकळ्या झालेल्या होत्या. मजा करत होत्या. त्यांचं त्यांचं एक समाज जीवन त्यांनी घडवलं होतं, परंपरेची त्यांना मदत झालेली असली तरी त्यातून वाट त्यांनीच शोधली होती. हे सखीत्व किती लोभस होतं. रोजची जगण्याची लढाई खेळत असताना त्यांना याची किती मदत होत असणार!

मधे मी एका महिला मंडळाच्या घरगुती कार्यक्रमाला गेले होते. तिथेही सगळ्या आज्याच होत्या आणि मस्त मजा करत होत्या. दूरदूरून येऊन नियमीतपणे भेटत होत्या. सखीत्व ही तुम्हाला मोकळं ्करणारी गोष्ट आहे.

या सखीत्वावर एकमेंकींना सामर्थ्य देण्याची चळवळ उभी राहीली. त्यांनी काही सामाजीक आणि राजकीय बदल घडवून आणले.एकमेंकींना भेटत राहून, अनुभवांविषयी बोलत राहूनच ’जे जे खाजगी ते ते राजकीय’ असं म्हणत जहाल स्त्रीवादी चळवळ ्पुढे आली. या चळवळीने कितीक गृहीतकांना धक्का दिला. विशेषतः घर ही स्त्रीसाठीची सुरक्षीत जागा आहे या समजाला मोडीत काढलं. घरातच स्त्रीयांना कशाकशाला तोंड द्यावं लागतं हे दाखवून दिलं. आताही कौटुंबीक हिंसाचार कायदा का आला? त्याची आकडेवारी काय दाखवून देते?

आपण हे सगळंच सोडून देऊ या. समजू यात की हे आपल्यापासून खूप दूर आहे. हे आपलं जग नाहीच मुळी! समजू यात की आपल्या जगात आपण सुरक्षीतच आहोत. हिंसा केवळ शारीरिक नसते. आपण ज्या वर्गात आहोत तिथे स्त्रीला तिची जागा (?) दाखवून देण्याचे खूप सभ्य मार्ग आहेत, विनोद हा त्यातला एक. (कधी कधी मला वाटते की बायका खरोखरच मठ्ठ आहेत असा तर पुरूषांचा समज झालेला नाही ना? हे सारं आम्ही हसून साजरं करावं अशी त्यांची इच्छा असते?) आपण स्त्री म्हणून एका पातळीवर असतो, सारख्या प्रश्नांना सामोरं जात असतो, काही सारखं शोधायचं असतं. त्यासाठी एकमेकींची मदत होऊ शकते. प्रवासात सोबत आहे याचा आधार असतो.

काही गोष्टींशी लढण्याचं बळ मी सखीत्वातून मिळवू शकते.



००००००००००००००

मैत्री ही खरं ’चला करू या’ म्हणून करण्याची गोष्ट नाही. ती होते. मैत्रीत सगळं बोलावच लागतं असं नाही, न बोलूनही कळतं. मैत्रीत महत्वाचं असतं कळणं, आतून आतून काय वाटतयं ते सहज कळणं , शब्द कुठलेही असोत. समजून घेणं, त्याची खात्री असणं.

००००००००००००००

3 comments:

  1. खरोखरच, त्या दिवशीचा गौराईच्या खे्ळांचा अनुभव विलक्षण होता. झोकदार, चपळ हालचाली, टिपेला पोचणारे, खुले, मोकळे सूर, त्याला टाळ्याचा ताल.. हे खेळ त्या त्यांच्या मावळातल्या गावांमधे- देवळांत, अंगणात खेळत असतील, ते वातावरण नक्कीच अनुभवण्याजोगं असेल. आम्ही भूगावला रहात होतो, तेव्हा या बायकांच्या जगण्यात थोडं डोकावता आलं. कमालीचे कष्ट करीत. घरातलं सगळं आटोपून शेतातल्या कामांना भिडत. पुन्हा संध्याकाळी घरी आल्यावर घरादाराला रांधून घालीत. लावणीच्या दिवसात तर त्यांचे हाल बघवत नसत. घरची कामं सांभाळून त्या शेतात दिवसभर गुडघाभर चिखलात ओणव्यानं लावणीचं काम करीत. पुरुषांनाही कष्ट असतच, पण त्यांना आरामाचे, विरंगुळ्याचे क्षणही मिळत. रात्री उशीरापर्य़ंत त्यांचं भजन असे, पारावर तंबाखू मळत शिळोप्याच्या गप्पा मारणारे बाप्ये तर कायमच दिसत. जत्रा हा प्रकार तर खास पुरुषांसाठीचा. तमाशाचे फ़ड, कुस्त्या, गणगोतांचा मेळावा, पोळी आणि नळी वगैरे. त्या दिवसात माझी शेजारीण मात्र कातावून गेलेली असे. दिवस दिवस ती सैपाकघरातून बाहेरच येत नसे. इतरही सगळ्या सण-उत्सवात अशीच राबणूक असे. पण गौरीचा सण आणि नागपंचमी मात्र खास बायकांचे सण. त्यातही राबणूक कमी नाही, पण सजण्या गडण्या भेटल्याने आनंदलेल्या माहेरवाष्णी, गौरींची कोडकौतुकं, आरास...वेगळाच उत्साह असे. हळदीकुंकवाच्या दिवशी सगळ्या बायका गावातल्या झाडून सार्‍या घरी हळदीकुंकवाला जात. छोट्या खोपटवजा घरांमधूनही गौरीची देखणी आरास असे. कपाळभर कुंकू माखलेल्या, नवं ल्यालेल्या, सजल्या धजलेल्या,चेष्टामस्करी करत, हसत खिदळत घरोघरी हिंडणार्‍या त्या गौराया बघायला फ़ार छान वाटे. हे सगळं फ़क्त त्यांच्यासाठी असे. त्या ते क्षण पुरेपूर लुटत, तो आनंद साठवून घेत आणि दुसर्‍या दिवसापासून त्याच त्या पिचवून टाकणार्‍या रहाटगाडग्याला पुन्हा जुंपून घेत.
    कॉलेजचे, हॉस्टेलचे दिवस संपल्यावर लग्नानंतर काही काळ माझा मैत्रिणींशी संपर्क होता. मग कमी कमी होत गेला. आता वर्षातून एखाददुसरा फ़ोन होतो, तेवढाच. अजुनही भेटलो की मधल्या वर्षांचा काळ केव्हाच गळून पडतो. पण सगळेच संदर्भ बदललेले असतात, मग फ़क्त जुन्या दिवसांबद्दलच बोलणं होत रहातं. काही जिवाभावाचं बोलावं एवढी फ़ुरसत मिळतच नाही. आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत थोडीफ़ार अशीच स्थिती असावी. शाळेमुळं, इंद्रधनूमुळं आपण जवळ आलो, मैत्रिणी झालो. आपली ही मैत्री उत्तरोत्तर अशीच गाढ आणि अर्थपूर्ण होत राहो! एकमेकींना आणि स्वतःला जाणत आणि जपत पुढे जाऊया.

    ReplyDelete
  2. आपण ज्या वर्गात आहोत तिथे स्त्रीला तिची जागा (?) दाखवून देण्याचे खूप सभ्य मार्ग आहेत, विनोद हा त्यातला एक. >> खरंच सतत बायकांच्या मठ्ठपणावरचे विनोद ऐकून चीड येते ना??

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...